राज्यभरात कमकुवत असणाऱ्या काँग्रेसच्या चंद्रपूर विजयाचा पॅटर्न महानगरपालिका निवडणुका यशस्वी होईल का? (Will the pattern of the Congress party's victory in Chandrapur, despite its weakness across the state, be successful in the municipal corporation elections?)
चंद्रपूर :- भाजपच्या आक्रमक प्रचारतंत्रापुढे काँग्रेसचा निभाव लागणे शक्य नाही. सामदामदंडभेद या नीतीमुळे तो भाजपसमोर टिकूच शकत नाही. पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष अजून बाहेरच आलेला नाही असा सार्वत्रिक समज संपूर्ण राज्यात पसरला असताना काँग्रेसने टोकावरच्या चंद्रपूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीत मिळवलेले यश अनेकांना आश्चर्यचकित करून गेले. २०१९ ला संपूर्ण राज्यात काँग्रेसची धूळधाण उडाली होती. मोदी लाटेच्या झंझावातात लोकसभेत केवळ एक जागा या पक्षाच्या पदरात पडली. ती होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. तेव्हा येथून बाळा धानोरकर विजयी झाले होते. संपूर्ण राज्यात युतीने निर्भेळ यश मिळवले असताना याच ठिकाणी पराभव झाला कसा या प्रश्नाने तेव्हा भाजपला छळले होते. तेव्हा या मतदारसंघात मोदींपेक्षा कुणबी लाट प्रभावी ठरली असा निष्कर्ष काढला गेला. तो पूर्णपणे चूक नव्हता पण खराही नव्हता. याचे एकमेव कारण या जिल्ह्याच्या राजकारणात दडले आहे. कधीकाळी भाजपचा गड असलेला हा जिल्हा नंतर हळूहळू काँग्रेस आघाडीकडे वळत गेला. हे स्थित्यंतर घडत असताना भाजपचे नेते गाफील राहिले तर काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा फायदा घेतला. मुळात या जिल्ह्याची राजकीय प्रकृतीच धर्मवादी राजकारणाला बळी न पडणारी. दलित व आदिवासी मतांची संख्या भरपूर असणे, शिवाय बहुसंख्येत असलेला कुणबी समाज हिंदुत्वाकडे न झुकता स्थानिक पातळीवर प्रभाव असणाऱ्या वेगवेगळ्या महाराजांच्या मठांकडे आकर्षित झालेला असणे. याचा योग्य फायदा काँग्रेसने उचलला. भाजपला हे गणित जुळवणे कधी जमले नाही. अपवाद फक्त गेल्या विधानसभा निवडणुकीचा. त्यावेळी 'कुणीतरी' केलेली बोगस मतदारनोंदणी भाजपच्या कामी आली, असे म्हणतात. त्यामुळे अतिशय कमी फरकाने काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. त्याचा वचपा आता या पक्षाने काढला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार याच जिल्ह्यातले. ब्रम्हपुरीचे आमदार. त्यांचे व खासदार प्रतिभा धानोरकरांचे अजिबात पटत नाही. याचा फायदा भाजपला होतो हे लक्षात आल्यावर इतर काँग्रेस नेत्यांनी या दोघांमध्ये तडजोड व्हावी म्हणून पुढाकार घेतला. यात अग्रक्रमावर होते ते जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे. जे जुनेजाणते नेते आहेत. या दोघांपेक्षा वरिष्ठ आहेत व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांची मध्यस्थी फायद्याची ठरली. वडेट्टीवार व धानोरकर यांनी आपापसातला वाद बाजूला ठेवला. याशिवाय धोटेंनी मतविभागणी करणाऱ्या लहान पक्षांना सोबत घेतले व उमेदवार चांगले दिले. त्यामुळे सात नगराध्यक्ष निवडून आले. भाजपची रणनीती आक्रमक असली तरी त्यात समन्वयाचा अभाव होता. याचे एकमेव कारण म्हणजे भाजपत या जिल्ह्यात उफाळून आलेली गटबाजी. सुधीर मुनगंटीवार विरुद्ध बाकी सारे असे चित्र खूप दिवसांपासून निर्माण झाले होते. या बाकींना पक्षाच्या वरिष्ठांची फूस होती. या सतत दिसत असलेल्या भांडणापेक्षा काँग्रेस बरी असा विचार मतदारांनी केला. या जिल्ह्याचे पालकमंत्री यवतमाळचे अशोक उईके आहेत. ते निवडणुकीच्या काळात अजिबात फिरकले नाहीत. याचा पुरेपूर फायदा काँग्रेसने उचलला. या जिल्ह्यातील आदिवासी आकाराने लहान पण वेगवेगळे झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पक्षांमध्ये विभागला गेला आहे. या सर्व पक्षांना स्वतंत्र लढू न देता एकत्र आणण्याची व आघाडीत सामावून घेण्याची कसरत काँग्रेसने केली. राजुरा-गडचांदूर या भागात वामनराव चटप यांच्या शेतकरी संघटनेचा जोर आहे. आजवर काँग्रेसपासून फटकून वागणारे व स्वतंत्र लढून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणारे अशीच चटपांची ओळख. यावेळी काँग्रेसने ते सोबत यावे म्हणून पुढाकार घेतला. संघटनेसोबतची आघाडी या पक्षाला फायद्याची ठरली. रिपब्लिकनांच्या विविध गटांची ताकद येथे नगण्य आहे पण वंचित व बसपचा काही भागात प्रभाव आहे. त्यांना सोबत घेतले असते तर भद्रावती, गडचांदूर येथेही काँग्रेसला यश मिळाले असते. सततचा पराभव समन्वयवादी भूमिका घेण्यासाठी भाग पाडतो. मात्र अनेक ठिकाणी काँग्रेसचे नेते अशी भूमिका घेत नाहीत. अनावश्यक ताठरपणा दाखवतात. यामुळे या पक्षाच्या पराभवाची मालिका खंडितच होत नाही. दुसरी बाब म्हणजे या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता. त्यात गटबाजी, एकमेकांचे पाय ओढणे ठासून भरलेले. हरलो तरी चालेल पण आपल्याच पक्षाच्या पण मान्य नसलेल्या उमेदवाराला पाडायचे यावरच अनेकजण शक्ती खर्च करतात. पक्ष जिवंत राहिला तर आपण राहू हे अजूनही अनेकांना उमगलेले नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांनी बराच समजूतदारपणा दाखवला. त्याचा फायदा त्यांना निकालात स्पष्टपणे दिसून आला, हाच समजूतदारपणा व समन्वय इतर जिल्ह्यात दिसून आला तर हा पॅटर्न इतर ठिकाणी सुद्धा यशस्वी होऊ शकतो. सलग मिळत जाणारी सत्ता चुका करायला भाग पाडते. भाजपच्या बाबतीत आता हे दिसू लागले आहे. याचा फायदा कसा उचलायचा हे काँग्रेसला ठरवावे लागणार आहे. चंद्रपूर पॅटर्नने या पक्षाचे डोळे उघडले तर येत्या निवडणुकांमध्ये अन्य जिल्ह्यात सुद्धा पक्षाला यश मिळू शकते याचा वस्तुपाठ चंद्रपूरने काँग्रेससमोर घालून दिला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या