वृत्तसेवा :- व्यवस्था फार क्रूर असते. कारण व्यवस्थेला माहित असतं, आपण व्यवस्थित आहोत. जे असंघटित आहेत तेच भरडले जातात. शिक्षक ही असाच व्यवस्थेकडून भरडला जाणारा नपुंसक प्राणी. महाराष्ट्र आणि बहुदा सबंध भारतातला असंघटित शिक्षक हा व्यवस्थेचा शिकार ठरतो आहे. कधी खाजगी शाळा मालकांकडून, कधी सरकारी यंत्रणांकडून तर कधी दुसऱ्या मार्गांनी, त्याला भरडलं जातंय. मागच्या 10-12 वर्षांपासून महाराष्ट्रात प्राध्यापक आणि शिक्षक भरती रखडलीय. पंचविशी किंवा तीशीतले होऊ घातलेले प्राध्यापक आणि शिक्षक आता 40-45 वयात स्थिरावलेत. शासन व्यवस्थेला भरती मुळात करायचीच नाही. आज न नाहीतर उद्या कॉलेजात, शाळेत पूर्ण वेळ नौकरी मिळेल 'या आशेवर हजारो तरुण तासिका तत्वावर आणि अपुऱ्या अनुदानावर पदरची भाकर खावून शिकवत आहेत. तासिका तत्वावर मिळणारा हा तुटपुंजा पगारही वेळेवर भेटत नाही. जगता येत नाही आणि मरताही येत नाही अशी अवस्था या शिकलेल्या तरुणवर्गाची झाली आहे. त्यातच कुठेतरी एखाद्या कॉलेजात एखाद्या प्राध्यापकाला नौकरी मिळते आणि त्याने 60 लाख 65 लाख देवून नौकरी मिळवल्याच्या बातम्या सर्वत्र पसरतात. वयाची 40-45 गाढलेली ही मास्तर मंडळी हतबल होवून शिक्षण व्यवस्थेची ही सारी पडझड पाहत असतात. यातले बरेच लोक रिक्षा चालवणे, वेटरचे काम करणे, डिलिवरी बॉयची नौकरी किंवा शेतमजुरीवर कामाला जाणे, भाजी - पाला विकणे, जेवणाचे डब्बे सप्लाय करणे अशी कामं करीत आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्रीमान. दवेंद्र फडणवीस साहेब, मा. अजित दादा पवार साहेब, आणि मा. एकनाथजी शिंदे साहेब या मंडळींनी मिळून मोठ्या शिताफीने महाराष्ट्रात आपलं सरकार निवडून आणलं. आता यांना पाच वर्षे कसलाच घोर नाही. लोकांनी यांना काही बोलायची गरज नाही. शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती, तसेच इतर सरकारी नोकऱ्यांची वाट पाहणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. पण हे सर्व घटक जोपर्यंत एक होणार नाहीत तोवर कसलाच बदल संभवत नाही.
माध्यमावर जे विषय चर्चीले जात आहेत त्यांचा आणि सामान्य माणसांच्या जगण्या- मरणाचा काही संबंध उरलेला नाही, अमर्याद लोकसंख्या, बेरोजगारी, आरोग्य विषयक समस्या, रस्ते-अपघात, प्रदूषण, उत्तम शिक्षणाचा अभाव, प्रादेशिक आर्थिक आणि सामाजिक असमतोल हे आजच्या सामान्य माणसाचे खरे विषय आहेत पण यावर कुणीही बोलायला तयारच नाही. अमुक सिनेमा' पहा आणि तमुक पाहू नका, असं सांगणारे विचारवंत आणि इतिहास अभ्यासक गल्ली-बोळात आणि पान टपऱ्यावर मावा खावून दुस-याच्या अंगावर पिचकारी उडविताना तुम्ही पाहिलेच असतील. महाराष्ट्रात सध्या शहाण्याला वेडा ठरविण्याची स्पर्धा लागलेली आहे. ज्याला सगळंच बरं-वाईट कळतं आणि जो बोलतो तोच मूर्ख सर्वांच्या दृष्टिने मूर्ख ठरतोय, तरुण पीढीच्या हातात मोबाईल नावाचं एक डबडं आलंय. त्यात डोकं घालून रात्रं-दिवस बसणाऱ्या पोरा-पोरींना आपल्या आयुष्याची होणारी राख-रांगोळी दिसेनाशी झालीय. धार्मिक उन्माद आणि कट्टरतेने धैमान घातलंय. माणूसकी दाखविण्याची संधी असताना व्हिडिओ बनवून प्रसिध्दी मिळवण्याची आस लागलेली नालायक तरुण पीढी सध्या पैदा झालीय. माणसे रस्त्यावर भरधाव वाहन चालवतायेत, रोज एक्सीडेंटमध्ये मेलेल्या, जखमी झालेल्या लोकांच्या बातम्या येतात, इथं माणसं किड्या- मुंग्यांप्रमाणे मरतायेत, कोणताही शहाणा माणूस खरंच हे सर्व उघड्या डोळ्यांनी हे सारं पाहू शकत नाही, संबंध 'मानव' समाजाला मूर्खपणाचा आजार झालाय की काय? असं वाटतंय, पण दुनियेकडं पाहिल्यावर विचार करणा-यावर हसणारे लोक बहुमतात असल्याचं स्पष्ट चित्र दिसतं. विचार करणाऱ्या माणसाला जर खरंच झोप हवी असेल तर असेल तर ती सध्याच्या महाराष्ट्रात शक्यच नाही. सर्व राजकीय नेते धडाडीचे अभिनेते बनले आहेत. सारे अभिनेते बेरोजगार झालेत, त्यांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन मिळणाऱ्या बिदागीवर आपला घरखर्च भागवावा लागतोय.
कुणी बैलासमोर नाचतंय, कुणी त्यावर प्रश्न विचारून आपण पत्रकार असल्याचं सागतंय. सगळं जगणं नवलाईचं झालंय. आपण आणि आपला समाज जर असंच जगत राहिलो तर आपला सर्वस्वी अंत अटळ आहे. आपले विचार, आपले आदर्श कधीचेच मरून गेले आहेत. आता उरल्या आहेत खोट्या अस्मिता. एकमेकाची डोकी फोडण्यासाठी. तसंही डोक्याच्या आतला मेंदू 90 % करप्ट झालेला आहे. माणसाला माणूस म्हणून पहायला शिकवणं ही शिक्षणाची जबाबदारी, पण ती पार पाडणार कशी? आता शाळा, कॉलेजं माणूस घडवणारी स्थळं नाहीत. ही तर चढाओढीचे केंद्रं आहेत. 12वी पास झालेली शेकडा 25-30 टक्के मुलं' मातृभाषेत ठीकपणे बोलू किंवा लिहू शकत नाहीत, यांच्यासाठी वैचारिक गोष्टी तर फार दूर राहिल्या. मोठ्यांप्रमाणे या मुलांचे मेंदूही पार करप्ट झालेत. यात शिक्षकाची जबाबदारी फार मोलाची, पण तो तर पार महालाचार झालाय. सरकारी शाळेत शिकवणारे अर्धे किंवा त्याहून अधिक शिक्षक अनुदानाची वाट पाहत आहेत. खाजगी शाळांचा गाडा बिचाऱ्या कष्टकरी महिला शिक्षिकांच्या खांदयावर ओढला जातोय. थोडं बरं इंग्रजी बोलता येणाऱ्या या कष्टकरी महिला शिक्षिका साधारण 5 हजारांपासून 50 हजार रूपये प्रति महिना वेतनावर भारताची अर्ध्याहून अधिक नवी पीढी घडवित आहेत. पुरुषांनी शिक्षकाची नौकरी (खाजगी शाळेत) करणे कधीचेच सोडलेले आहे. महाविद्यालयांची स्थिती त्याहून वाईट. 'बोटावर मोजण्या इतकी खाजगी अनुदानित महाविद्यालयं, त्यांनाही अशीच घरघर लागलीय. शिकलेल्याना नोकऱ्या नाहीत. महाविद्यालयात शिकवणं कमी आणि परीक्षा जास्त होतायत. नापास झाल्यावर परत परीक्षा घ्याव्या लागतात.' प्राध्यापक मंडळी वर्षभर परीक्षा कार्यक्रमांत गुंतलेले आणि दुसरीकडे महाविद्यालयं सुरू आहेत ती तासिका तत्वावर काम करणाऱ्या, कामगारी प्राध्यापकांच्या खांदयावर. खरंतर 'तासिकातत्वावर काम करणारे महाविद्यालयीन प्राध्यापक हे 'कामगार' या संज्ञेत ही बसत नाहीत. कामगार पूर्ण दिवसासाठी कामावर अस्तो. त्याला संपूर्ण दिवसाचा मेहनताना मिळत असतो, 'तासिका 'तत्वावर काम करणारा प्राध्यापक मोठ्या आशेने अध्यापनाचं काम करतोय. बऱ्याच वेळा 4-5 महीने पगार भेटत नाही, तरी पदरमोड करून हे लोक महाज्ञान दान तो करत असतात. पण या साऱ्या गोष्टींची कदर कुणाला आहे? विद्यार्थी? सहकारी प्राध्यापक? प्राचार्य? संस्थाचालक? राजकारणी? की त्या प्राध्यापकाच्या परिवारातील लोक? अहो! खरंच! असे हजारो शिक्षक आज आपल्या समाजात मस्करीचे विषय ठरत आहेत. खरंच खूप मोठी व्यथा आहे ह्यांची. सरकार नावाची एक संघठना किंवा व्यवस्था म्हणू, खरंच हो! खरंच! ही व्यवस्था फार क्रूर आहे, इथं शिक्षक, प्राध्यापक हा पूर्ण भरडला गेलेला प्राणी आहे. आता त्याचं पार पोतेरं झालंय. आता तो बंड खरंच करणार? हतबल झालेला शिक्षक स्वतःसाठी लढू न शकणारा हा शिक्षक किंवा प्राध्यापक उद्याचा लढवय्या समाज घडवू शकेल? काय? तुमच्याकडे आहे का काही उत्तर?
संकलन :- डॉ. महावीर रामचंद्र साबळे - 9657502044
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या