चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालय निर्मिसाठी मुद्रांक शुल्क माफ, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकार्यांचे मानले आभार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय (Stamp duty waived for construction of cancer hospital in Chandrapur, thanks to cooperation of Chief Minister and Cabinet, important decision of State Cabinet after follow-up by Guardian Minister Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालय निर्मिसाठी मुद्रांक शुल्क माफ, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकार्यांचे मानले आभार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय (Stamp duty waived for construction of cancer hospital in Chandrapur, thanks to cooperation of Chief Minister and Cabinet, important decision of State Cabinet after follow-up by Guardian Minister Sudhir Mungantiwar)


मुंबई :- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 100 बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ कारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 26 जुनच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटल च्या सहकार्याने भव्य कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील व लगतच्या आदिवासीबहुल क्षेत्रातील कर्क रुग्णांवर सहज उपचार करता येईल असे विशेष रुग्णालय चंद्रपूरला व्हावे अशी ना. मुनगंटीवार यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. राज्य शासन, जिल्हा खनीज प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात त्यांनी रुग्णालयासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली 10 एकर जमीन 30 वर्षांसाठी प्रति वर्ष एक रुपया नाममात्र दराने भुईभाड्याने प्रदान केलेल्या जागेच्या करारनाम्यास मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. 26 जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीचा अतिशय संवेदनशीलतेने विचार करून, मंत्रिमंडळाने हा विषय चर्चेला घेतला आणि कर्करोगाने ग्रस्त गरीब, मध्यमावर्गीय नागरिकांसाठी शंभर खाटांच्या या रुग्णालय निर्मितीसंदर्भात निर्णय घेत मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या निर्णयास मंजुरी प्रदान केली. सदर रुग्णालयाच्या जमिनीचे बाजार मूल्य मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी 15 कोटी 62 लक्ष 14 हजार 200 रुपये निश्चित केले असून, या बाजार मूल्याच्या एकूण 90% प्रमाणे 14 कोटी 5 लक्ष 92 हजार 800 रुपये या रकमेवर 5% दराने 70 लक्ष, 29 हजार 640 रुपये एवढा मुद्रांक शुल्क आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे माफ होणार आहे. चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना आरोग्यविषयक सर्व अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने सातत्याने ना. मुनगंटीवार यांचा प्रयत्न राहिला आहे. या संदर्भात ना मुनगंटीवार म्हणाले कि, ज्या ज्या वेळी मी चंद्रपूर जिल्ह्यातील विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले आहेत, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गांभीर्याने विचार करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लोकहिताच्या कामासाठी राज्य सरकार सातत्याने पुढाकार घेत असून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माण कार्यासाठी व कर्करोग रुग्णालय निर्मितीसाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)