तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद! १५ दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश नागरिकांचा सुटकेचा निःश्वास (Tiger responsible for three deaths finally captured! 15 days of relentless effort pay off; citizens heave a sigh of relief.)
चंद्रपूर :- तीन जणांचा बळी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील चिंमूर वनपरिक्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून या वाघाचा माग काढला जात होता. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाची ओळख टीएटीआर 189 एसएएम/ बीआरए टी 130 एसएएम अशी असून, त्याचे वय अंदाजे पाच वर्षे आहे. या वाघाने यापूर्वी संबंधित वनक्षेत्रात दोन जणांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर ब्रह्मपुरी वनविभागाच्या हद्दीतही एका व्यक्तीला ठार केले. सलग तीन बळी घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर होते. अत्यंत सावधपणे वावरणाऱ्या या वाघाला अखेर ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून वनविभागाची रेस्क्यू टीम त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. मात्र, ठिकाण बदलण्याची सवय आणि मानवी हालचालींचा अंदाज घेऊन सावधपणे वावरण्याच्या त्याच्या स्वभावामुळे मोहिमेत वारंवार अडथळे येत होते. तरीही पथकाने पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर ३ नोव्हेंबरच्या रात्री योग्य संधी साधत त्याला बेशुद्ध करण्याची कारवाई यशस्वी केली. रात्री ११.४० वाजता वाघाला डार्ट मारण्यात आला. त्यानंतर १२.१० वाजता त्याला स्ट्रेचरवर घेण्यात आले. रात्री १२.२५ वाजता त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया तपासून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या ब्रह्मपुरी येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) हलविण्यात आले. ही कारवाई चिंमूर वनपरिक्षेत्रातील चिंमूर नियतक्षेत्राच्या गडगाव बीटमधील कक्ष क्रमांक ३८० येथे करण्यात आली. या मोहिमेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे, शूटर अजय सी. मराठे, ब्रह्मपुरीचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्यासह योगेश लकडे, दीपेश तेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल्ल वटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन जणांचा बळी घेणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्याची मोहीम अत्यंत संवेदनशील बनली होती. पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने नियोजन, सतर्कता आणि समन्वयाच्या बळावर ही मोहीम फत्ते केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या