बल्लारपूर : कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. तालुक्यातील गिलबिली गावालगतच्या जंगल परिसरात १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी पळ काढला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, कोंबडे आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक ग्रामीण भागात गस्त घालत असताना गिलबिली गावालगतच्या जंगल परिसरात काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जंगल परिसरात पोहोचताच कोंबड्यांच्या झुंजीवर ५०० रुपयांची बाजी लावल्याचे आवाज पोलिसांना ऐकू आले. त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काही जण हातातील कोंबडे घेऊन जंगलाच्या दिशेने पळू लागले. मात्र, पोलिसांनी तातडीने पाठलाग करून सहा जणांना पकडले. त्यानंतर आरोपींची अंगझडती घेण्यात आली असता त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.
या कारवाईत नरेश भगतसिंग मडावी (३०), रा. शिवाजी वार्ड, मूल, आनंदराव नामदेव वडस्कर (४६), रा. चनाखा ता राजुरा, संजय बाबाजी फुलझेले (५३, रा. येरगाव ता मुल, सचिन यशवंत जगन्नाथ (३४), रा. चिमडा ता. मुल, कोमल जगन्नाथ निमगडे (३२), रा. पोंभुर्णा आणि गणपत भाऊजी मडावी (६०), रा. येरगाव ता. मुल यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, जुगारातून जिंकलेली रक्कम, चार मोबाईल, तीन दुचाकी, चार कोंबडे आणि कोंबड्यांच्या झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या कातीचे दोन नग जप्त केले. असा एकूण १ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा सत्यवान कोटनाके, संतोष पंडीत, पुरुषोत्तम चिकाटे, पंकज शिंदे, पोअं शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी, वैभव गाडगे, गुरु शिंदे, मिलिंद आत्राम, महेश कुकुडकर, सचिन अल्लेवार, शरदचंद्र कारुस यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या