Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नागपूरच्या विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाचे रहस्य समजून घ्या ! पहिली पसंती, दुसरी पसंती म्हणजे नेमके काय? (Understand the secret behind the shocking result of the Nagpur Legislative Council election! What exactly do 'first preference' and 'second preference' mean?)

नागपूरच्या विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाचे रहस्य समजून घ्या ! पहिली पसंती, दुसरी पसंती म्हणजे नेमके काय? (Understand the secret behind the shocking result of the Nagpur Legislative Council election! What exactly do 'first preference' and 'second preference' mean?)

वृत्तसेवा :- विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल पाहताना अनेकांना प्रश्न पडतो सकाळ पासून एक उमेदवार पुढे होता, मग रात्री दुसराच कसा जिंकला? पहिल्या पसंतीची मते मोजून झाली, तरी निकाल का लागत नाही? दुसऱ्या पसंतीची मते म्हणजे मतदार पुन्हा मतदान करतात काय? मतमोजणीला दोन दिवस का लागतात? हे समजून घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची पद्धत पाहूया. या प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची पद्धत परिचित आहे. मतदार एका उमेदवाराला मत देतो. शेवटी ज्याला सर्वाधिक मते मिळतात, तो विजयी होतो. उदाहरणार्थ, तीन उमेदवारांना अनुक्रमे चाळीस, पस्तीस आणि पंचवीस मते मिळाली, तर चाळीस मते मिळवणारा उमेदवार जिंकतो. उरलेल्या साठ मतदारांनी त्याला मत दिलेले नसले, तरी त्याच्या विजयाला अडचण येत नाही. कारण त्याला इतर प्रत्येक उमेदवारापेक्षा जास्त मते मिळालेली असतात. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत मात्र पद्धत वेगळी असते. येथे मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर आपल्या आवडीनुसार क्रमांक लिहिता येतात. सर्वांत आवडणाऱ्या उमेदवारासमोर ‘१’, त्यानंतर पसंत असणाऱ्यासमोर ‘२’ आणि पुढच्या उमेदवारासमोर ‘३’, असे क्रमांक देता येतात. पहिली पसंती म्हणजे मतदाराची पहिली निवड. दुसरी पसंती म्हणजे पहिला उमेदवार स्पर्धेतून बाद झाला, तर त्यानंतर आपले मत कोणाला मिळावे, याची निवड. मतदार पुन्हा मतदान करायला जात नाही. त्याने मूळ मतपत्रिकेवर दिलेले क्रमांकच पुढे उपयोगी पडतात. घरात एखाद्याला बाजारात पाठवताना आपण सांगतो, ‘‘आंबे मिळाले तर आंबे आण. आंबे नसतील, तर सफरचंद आण. तेही नसतील, तर संत्री आण.’’ याचा अर्थ तिन्ही फळे आणायला सांगितलेली नसतात. आपली पहिली निवड शक्य नसेल, तर पुढची निवड कोणती, हे आपण सांगत असतो. मतदानातील पसंतीक्रमही साधारण असाच समजता येईल. फरक एवढाच की येथे उमेदवार मतमोजणीच्या प्रक्रियेत बाद होतात आणि त्यानुसार मत पुढे जाते.
         आता मतमोजणी कशी होते ते पाहू. सुरुवातीला मतपत्रिका तपासून वैध आणि अवैध मते वेगळी केली जातात. त्यानंतर पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. त्याच वेळी जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मतांची संख्या ठरवली जाते. या संख्येला ‘कोटा’ म्हणतात. शब्द अवघड वाटला तरी अर्थ सोपा आहे—विजयासाठी गाठायचा मतांचा आकडा! एका जागेच्या या निवडणुकीत सुरुवातीच्या एकूण वैध मतांच्या निम्म्यापेक्षा अधिक मते आवश्यक असतात. शंभर वैध मते असतील, तर जिंकण्यासाठी एकावन्न मतांचा कोटा असतो. समजा, आशा, बाळासाहेब आणि चंद्रकांत असे तीन उमेदवार निवडणुकीत आहेत. शंभर वैध मतांपैकी आशांना चाळीस, बाळासाहेबांना पस्तीस आणि चंद्रकांतांना पंचवीस पहिल्या पसंतीची मते मिळाली. आशा सर्वांत पुढे आहेत. तरीही लगेच त्यांना विजयी घोषित करता येणार नाही. कारण विजयासाठी आवश्यक असलेली एकावन्न मते त्यांना मिळालेली नाहीत. बाळासाहेब आणि चंद्रकांत यांनाही तो आकडा गाठता आलेला नाही. अशा वेळी सर्वांत कमी मते मिळालेले चंद्रकांत स्पर्धेतून बाद होतील. आता त्यांच्या पंचवीस मतपत्रिका पुन्हा उघडून पाहिल्या जातील. चंद्रकांतांना पहिली पसंती देणाऱ्या मतदारांनी दुसरी पसंती कुणाला दिली आहे, हे तपासले जाईल. समजा, त्यातील वीस मतदारांनी बाळासाहेबांना आणि पाच मतदारांनी आशांना दुसरी पसंती दिली. तर बाळासाहेबांच्या आधीच्या पस्तीस मतांत वीस मतांची भर पडेल. त्यांची एकूण मते पंचावन्न होतील. आशांच्या चाळीस मतांत पाच मते मिळून त्यांची संख्या पंचेचाळीस होईल. बाळासाहेबांनी एकावन्न मतांचा कोटा ओलांडल्यामुळे ते विजयी होतील. म्हणजे सुरुवातीला आशा पुढे होत्या; पण शेवटी बाळासाहेब जिंकले! यात मतमोजणी उलटी झालेली नसते किंवा कोणालाही जास्तीचे मत दिलेले नसते. चंद्रकांतांना मत देणाऱ्या लोकांनी आधीच सांगून ठेवले होते की, ‘‘चंद्रकांत बाद झाले, तर आमचे मत बाळासाहेबांना किंवा आशांना द्या.’’ मतमोजणीत त्यांच्या याच इच्छेची अंमलबजावणी झालेली असते. प्रत्येकाचे मत एकच असते; ते एकाच वेळी दोन उमेदवारांच्या खात्यात मोजले जात नाही.
           येथे आणखी एक गैरसमज दूर करायला हवा. दुसऱ्या पसंतीची मोजणी सुरू झाली म्हणजे सगळ्याच मतपत्रिकां वरील ‘२’ क्रमांक मोजतात, असे नाही. आपल्या उदाहरणात आशा आणि बाळासाहेब स्पर्धेत कायम आहेत. त्यामुळे त्यांना पहिली पसंती देणाऱ्या मतदारांच्या दुसऱ्या पसंतीकडे त्या टप्प्यावर पाहिले जात नाही. फक्त बाद झालेल्या चंद्रकांतांच्या मतपत्रिका तपासल्या जातात. अनेक उमेदवार असतील, तर कमी मते असलेले उमेदवार नियमानुसार बाद होत जातात आणि त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंती पाहिली जाते. म्हणून एखाद्या मतपत्रिकेवरील तिसरी किंवा त्यापुढची पसंतीही उपयोगी पडू शकते. पण एखाद्या मतदाराने चंद्रकांतांच्या नावासमोर फक्त ‘१’ लिहिले आणि पुढे कुणालाच पसंती दिली नाही, तर काय होईल? त्याचे चंद्रकांतांना दिलेले मत सुरुवातीला वैध असेल. मात्र चंद्रकांत बाद झाल्यानंतर ते मत पुढे कोणाला द्यावे, हे मतदाराने सांगितलेले नसते. त्यामुळे त्या मताचा पुढचा प्रवास थांबतो. याचा अर्थ ते मत सुरुवातीपासून अवैध होते असा नाही. त्याचे पुढे हस्तांतरण करता येत नाही, एवढाच अर्थ आहे. अशा मतांमुळे कधीकधी शेवटपर्यंत कोणालाही मूळ कोटा गाठता येत नाही. तरी निवडणूक अनिर्णित राहत नाही. नियमानुसार उमेदवार बाद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी एकच उमेदवार स्पर्धेत उरला, तर आवश्यक कोटा मिळाला नसला तरी त्याला विजयी घोषित करता येते. त्यामुळे अंतिम विजेत्याच्या मतांचा आकडा पाहून ‘‘याने कोटा गाठलाच नाही, मग हा जिंकला कसा?’’ असा प्रश्न पडला, तर हे कारण लक्षात घ्यावे. याच सगळ्या प्रक्रियेमुळे मतमोजणीला वेळ लागतो. मतपत्रिका तपासणे, पहिली पसंती मोजणे, बाद झालेल्या उमेदवारांच्या मतपत्रिका पुन्हा पाहणे आणि त्यावरील पुढील पसंतीनुसार मते वाटणे, ही कामे काळजीपूर्वक करावी लागतात. म्हणून अशा निवडणुकीत सुरुवातीची आघाडी म्हणजे अंतिम विजय नसतो. पहिल्या पसंतीत किती लोक आपल्या पाठीशी आहेत, हे महत्त्वाचे असतेच; पण पहिली निवड बाद झाल्यावर आणखी किती मतदार आपल्याला स्वीकारतात, हेही निकाल ठरवू शकते !

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या