चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी...! (MLA Sudhir Mungantiwar has demanded that Chief Minister Devendra Fadnavis cancel the proposed Kanhalgaon Sanctuary in Chandrapur district...!)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्याची मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये घोषित केलेल्या या अभयारण्याला मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. तसेच, या अभयारण्याच्या निर्मितीसाठी आग्रही असलेल्या मुंबईतील तथाकथित पर्यावरणवाद्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 31 हजार हेक्टर वनक्षेत्रावर कन्हाळगाव अभयारण्य प्रस्तावित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन वनमंत्री यांच्या काळात 2020 मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यापूर्वी 2014 ते 2019 या कालावधीत वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन या अभयारण्याला मान्यता दिली नव्हती. आता हे अभयारण्य रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कन्हाळगावचा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि कावल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या टायगर कॉरिडॉरचा भाग आहे. या जंगलात समृद्ध जैवविविधता असून, सध्या या परिसरात अंदाजे 22 ते 32 वाघांचा अधिवास असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अभयारण्य घोषित झाल्यास जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर आणि पारंपरिक हक्कांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली आहे. दरम्यान, या अभयारण्याला स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही मुंबईतील काही पर्यावरणवादी त्याच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. जंगल आणि स्थानिकांच्या प्रश्नांबाबत भूमिका घेताना पर्यावरण वाद्यांकडून दुजाभाव केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. उद्योगांसाठी जंगलतोड केली जाते, त्यावेळी हेच पर्यावरणवादी तोंडाला फेविकॉल लावून गप्प बसतात, असं म्हणत त्यांनी या पर्यावरणवाद्यांवर निशाणा साधला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या