लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, वरोऱ्यात तीन लाखाची लाच घेतांना ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांना अटक (Anti-Corruption Bureau operation: Gram Panchayat official and Extension Officer arrested in Warora while accepting a bribe of three lakh rupees.)
चंद्रपूर :- शेतात बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रंगेहात पकडले. या प्रकरणात पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे वरोरा पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे. पांडुरंग निलकंठ पेंदे ४८ वर्ष , ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत नागरी, ता. वरोरा आणि प्रणव सुधाकर बक्षी ५१ वर्ष , विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती वरोरा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. विश्वसनीय सूत्राद्वारे प्राप्त माहितीनुसार, एका ३७ वर्षीय तक्रारदाराच्या व त्यांच्या भावाच्या नावे असलेल्या शेतात बार अँड रेस्टॉरंटचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या कामासाठी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांनी स्वतःसाठी आणि आपले वरिष्ठ अधिकारी प्रणव बक्षी यांच्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. यावेळी तक्रारदाराने पांडुरंग पेंदे यांची वरोरा येथील आनंदवन चौकात भेट घेतली असता, त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी कायम ठेवत तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पांडुरंग पेंदे यांनी सांगितलेल्या ठिकाणानुसार तक्रारदार मौजा खांबाळा येथे पोहोचला. यावेळी पेंदे यांनी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात प्रणव बक्षी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल होताच दोन्ही अधिकाऱ्यांच्या अटकेची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम, पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहुरपवार, महिला पोलीस शिपाई सीमा झाडे, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम तसेच चालक पोलीस शिपाई संदीप कवरासे मो.प.वि. चंद्रपूर यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या