स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४३ हजार २५० रुपये किमतीचा देशी दारूसाठा जप्त (Action by the Local Crime Branch: A stock of locally-made liquor worth 43,250 rupees seized within the jurisdiction of the Shegaon Police Station.)
चंद्रपूर :- घराच्या चार भिंतीआड सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चारगाव (बु.) येथे एका महिलेच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ४३ हजार २५० रुपये किमतीचा देशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक शेगाव बु. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत चारगाव (बु.) येथील सौ. मनिषा नितेश देठे (वय ३०) ही आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा करून त्याची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित महिलेच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात देशी दारूच्या तब्बल ९ पेट्या आढळून आल्या. त्यामध्ये ९० एमएलच्या एकूण ८६५ दारूच्या शिश्या होत्या. पोलिसांनी हा संपूर्ण दारूसाठा जप्त केला असून त्याची किंमत ४३ हजार २५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी महिला आरोपी सौ. मनिषा नितेश देठे, रा. चारगाव (बु.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर हिच्याविरुद्ध शेगाव बु. पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन कुरेकर, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनाके आणि पोलीस शिपाई अमोल सावे यांच्या पथकाने केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या