Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गोंडवाना विद्यापीठात ‘उच्चशिक्षणाची बदलती दिशा: "अर्थशास्त्रातील संधी व आव्हाने" या विषयावर व्याख्यान संपन्न (Lecture on ‘The Changing Direction of Higher Education: Opportunities and Challenges in Economics’ Held at Gondwana University)

गोंडवाना विद्यापीठात ‘उच्चशिक्षणाची बदलती दिशा: "अर्थशास्त्रातील संधी व आव्हाने" या विषयावर व्याख्यान संपन्न (Lecture on ‘The Changing Direction of Higher Education: Opportunities and Challenges in Economics’ Held at Gondwana University)

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी विशाल मेश्रामचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘उच्चशिक्षणाची बदलती दिशा: विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन येथील पदव्युत्तर पदवीचा (PG) विद्यार्थी श्री. विशाल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपयोजित अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा हजारे होत्या. विशाल मेश्राम हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. त्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातून, उच्च माध्यमिक शिक्षण चामोर्शी येथून, पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे आणि पहिली पदव्युत्तर पदवी अजीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू येथून पूर्ण केली. सध्या त्याची जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 'सार्वजनिक धोरण' (Public Policy) या विषयात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विद्यापीठातर्फे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला होता. 
             स्पर्धा परीक्षेसाठी उच्च शिक्षण थांबवू नका: विशाल मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विशाल मेश्राम म्हणाला, "अर्थशास्त्राचे दर्जेदार शिक्षण घेतल्यास शासकीय व खाजगी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या अनेक संधी केवळ भारतातच नाही तर विदेशातही उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची आवड आहे, त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी जरूर करावी; मात्र सोबतच 'ऑप्शन-बी' (दुसरा पर्याय) तयार ठेवणे आवश्यक आहे." पुढे बोलताना त्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला की, स्पर्धा परीक्षेसाठी आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडू नका. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणात प्रचंड संधी आहेत. त्यासाठी फक्त अधिक मेहनत, संयम आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी हवी. उच्च शिक्षणामुळे केवळ चांगल्या पगाराची नोकरीच मिळत नाही, तर ज्ञानाची भूकही भागवता येते, असे प्रतिपादन त्याने केले. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. उत्तमचंद कांबळे, आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, मराठी विभागाचे सहा. प्रा. अमोल चव्हाण उपस्थित होते. या व्याख्यानाला उपयोजित अर्थशास्त्र, वाणिज्य विभाग तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नेटके संचालन उपयोजित अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. महेंद्र वर्धलवार यांनी केले, योग्य नियोजन डॉ. धैर्यशील खामकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अनंता गावंडे यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या