बल्लारपूर :- बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचा युवा खेळाडू आरुष अंकुश चव्हाण याने गोवा येथील बांबोलीन स्टेडियमवर आयोजित ३७ व्या वेस्ट झोन ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करीत पेटॅथलॉनमध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच महाराष्ट्र मिडले रिले संघाचे प्रतिनिधित्व करीत या प्रकारातही सुवर्णपदक मिळवून त्याने बल्लारपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या पेटॅथलॉन स्पर्धेत लॉंग जंप, शॉटपुट अर्थात गोळाफेक, हर्डल्स, ६० मीटर धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या सर्व प्रकारांतील कामगिरीच्या आधारे मिळालेल्या गुणांच्या एकत्रित गुणांकनातून आरुषने अव्वल कामगिरी करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून सुवर्णपदक मिळविणारा आरुष हा एकमेव खेळाडू ठरल्याचे सांगण्यात आले.
आरुष अंकुश चव्हाण हा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर नियमित सराव करतो. नियमित सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय त्याने आई-वडील, प्रशिक्षक व मार्गदर्शकांना दिले. आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी त्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आई-वडील तसेच मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते, असे आरुषने आपल्या मनोगतात सांगितले. आगामी सर्व स्पर्धांवर लक्ष केंद्रित करून आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला. आरुषच्या या यशाबद्दल बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या