धक्कादायक...! गेल्या ४ वर्षांत तब्बल १११ खासदार आणि आमदारांच पक्षांतर, पक्षांतर बंदी कायद्याची होतेय पायमल्ली ? (Shocking...! A staggering 111 MPs and MLAs have switched parties in the last four years; is the anti-defection law being flouted?)
वृत्तसेवा :- गेल्या चार वर्षांत पक्षफुटीच्या घटना वाढल्या आहेत. एका चिन्हावर निवडून आलेले आमदार, खासदार अगदी बिनदिक्कतपणे दुसऱ्या पक्षात जात आहे. त्यामुळे मतदारांची राजरोसपणे फसवणूक सुरू आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत तब्बल १११ खासदार आणि आमदारांनी निवडणूक जिंकल्यावर पक्षांतर केलं. यामध्ये २६ लोकसभेचे खासदार, ७ राज्यसभेचे खासदार आणि ७८ आमदारांचा समावेश आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचनं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि मग दुसऱ्याच पक्षात जायचं यामध्ये नागालँड आणि पश्चिम बंगालचे लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचनं केलेल्या विश्लेषणात वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आलेल्या पक्षांतरांचा समावेश आहे. यात थेट पक्षांतर, पक्षांचं विलिनीकरण, राजीनामा देऊन पोटनिवडणूक जिंकणं, अपात्र ठरवल्यावर पोटनिवडणूक जिंकणं यांचा समावेश आहे. पक्षांतराच्या राज्यवार आकडेवारीत नागालँड पहिल्या स्थानी आहे. इथल्या तब्बल ३२ आमदारांनी गेल्या ४ वर्षांत पक्षांतर केलं. यानंतर पश्चिम बंगाल (२०), तेलंगणा (९), गोवा आणि पंजाब (प्रत्येकी ८), महाराष्ट्र आणि मेघालय (प्रत्येकी ६), मणिपूर (५) या राज्यांचा क्रमांक लागतो. गेल्या ४ वर्षांत १११ आमदार, खासदारांनी पक्षांतरं केली. यातील ४७ जण नागालँड आणि पश्चिम बंगालमधील आहेत.
पक्षांतराचा सर्वाधिक लाभ एनपीएफला झाला. पक्षात ३२ आमदार सहभागी झाले. यानंतर केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचा नंबर लागतो. भाजपमध्ये गेलेल्या लोकप्रतिनिधांचा आकडा २९ इतका आहे. यानंतर एनसीपीआय (२०), काँग्रेस (९), शिवसेना (८), एनपीपी (६), पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (४) यांचा नंबर लागतो. पक्षांतर करणाऱ्या १११ लोकप्रतिनिधींपैकी तब्बल ८१ जण एनपीएफ, भाजप, एनसीपीआयमध्ये गेले आहेत. एनडीपीएफ मधून सर्वाधिक गळती झाली आहे. २५ लोकप्रतिनिधींनी पक्षाला रामराम केला. यानंतर तृणमूल काँग्रेस (२०), काँग्रेस (१९), बीआरएस (९), आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (प्रत्येकी ७), शिवसेना उबाठा (६), जेडीयू (५) आणि एनपीपी (४) यांचा क्रमांक लागतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या