Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी महाराष्ट्र शासनाची ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या मंजुरी विकासकामे सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार (The Maharashtra government has approved ₹56,90,68,453 for the Chandrapur Dikshabhumi; sources indicate that the development works will be carried out under the guidance of the Social Justice Department.)

चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी महाराष्ट्र शासनाची ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या मंजुरी विकासकामे सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार (The Maharashtra government has approved ₹56,90,68,453 for the Chandrapur Dikshabhumi; sources indicate that the development works will be carried out under the guidance of the Social Justice Department.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती 

चंद्रपूर :- ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या विकास प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या निधीचा थेट संबंध संस्थेच्या खात्याशी नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी, चंद्रपूरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. विकासकामे सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय व तांत्रिक देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दीक्षाभूमी परिसरात अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल आणि विविध संशोधन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. विकासाच्या पुढील टप्प्यात भव्य विहार, भिक्खू निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विविध सोयी-सुविधा आणि परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. स्थानिक आमदारांच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विधानसभेतही भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण होऊन ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे संस्थेने स्पष्ट केले. दीक्षाभूमी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि प्रबोधनाचे प्रेरणास्थान आहे. या स्थळाचा जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानकेंद्राच्या संकल्पनेनुसार त्याचा विकास व्हावा, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.


       दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी दीक्षाभूमी विकास आणि आगामी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या नियोजनासाठी संस्थेच्या वतीने सामूहिक बैठक घेण्यात आली होती. समाजबांधवांना संस्थेची भूमिका, विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन याबाबत माहिती देणे, तसेच प्रश्न व सूचना ऐकून घेणे हा बैठकीचा उद्देश होता. मात्र, चर्चेदरम्यान काही उपस्थितांकडून विषयांतर आणि गोंधळ झाल्याने नियोजित चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून बैठक पुढे न चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने सांगितले दीक्षाभूमीच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला व्यापक स्वरूप देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या मान्यतेनुसार दीक्षाभूमी विहार विकास समिती ची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील विविध विहार आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीच्या माध्यमातून वर्षभर धम्मप्रबोधन कार्यक्रम, बुद्धवंदना, व्याख्याने, धम्मशिबिरे, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम, युवक व महिला सहभागाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जयंती व स्मृतिदिनांचे आयोजन करण्यात येणार आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत गौतम बुद्ध जयंती आणि महापरिनिर्वाण दिन यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगीही विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. दीक्षाभूमी केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता वर्षभर धम्म, प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनावे, हा समितीचा उद्देश आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध विहारांचे प्रमुख, संस्था-संघटना, भिक्खू संघ, सामाजिक कार्यकर्ते, धम्म अनुयायी, युवक आणि महिलांना सोबत घेऊन समन्वयाने काम करण्याचा समितीचा मानस आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी मतभेदांपेक्षा सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. वाद नको, संवाद हवा आरोप नको, अधिकृत माहिती हवी. मतभेद असले तरी दीक्षाभूमीचा विकास त्यापेक्षा मोठा आहे, अशी भूमिका संस्थेने मांडत सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन विकासाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या