Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

हिंदी विश्वविद्यालयाची मूलभूत सुविधांची मागणी करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक सुजात आंबेडकर आज वर्ध्यात विद्यार्थ्यांची भेट घेणार ! (Action taken against six students demanding basic amenities at the Hindi University; 'Samyak Vidyarthi Andolan' takes an aggressive stance; Sujat Ambedkar to meet the students in Wardha today!)

हिंदी विश्वविद्यालयाची मूलभूत सुविधांची मागणी करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई; सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक सुजात आंबेडकर आज वर्ध्यात विद्यार्थ्यांची भेट घेणार ! (Action taken against six students demanding basic amenities at the Hindi University; 'Samyak Vidyarthi Andolan' takes an aggressive stance; Sujat Ambedkar to meet the students in Wardha today!)

वर्धा : आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील सहा विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हकालपट्टी करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याच्या प्रकरणावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक झाले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील बंद असलेले ग्रंथालय सुरू करावे, मेसच्या व्यवस्थेत सुधारणा करावी, स्वच्छ पाणी व चांगल्या राहणीमानाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मूलभूत मागण्या केल्या होत्या. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला आहे. आज वर्ध्यातील शासकीय विश्रामगृह येथे पीडित विद्यार्थ्यांना सोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या शिष्टमंडळाने वसतिगृहातून बाहेर काढण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते कमलेश उबाळे म्हणाले की, वसतिगृहातील मेसच्या जेवणात किडे आढळून आले आहेत. तसेच वॉटर फिल्टरमधून तपकिरी रंगाचे पाणी येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा वापर करता येत नाही. या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ‘मूलभूत सुविधा मागणे हा गुन्हा आहे का?’ विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याऐवजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना वसतिगृहातून बाहेर काढले.
          “भारतामध्ये स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी आणि ग्रंथालयाची सुविधा मागणे हा गुन्हा कधीपासून झाला?” असा सवाल सम्यक विद्यार्थी आंदोलनाने उपस्थित केला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षा विरोधात प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. संबंधित सहा विद्यार्थी आदिवासी, ओबीसी समाजातील असल्याने त्यांच्याशी जातीय भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोपही आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. सुजात आंबेडकर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच या प्रकरणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उद्या दिनांक 10 सप्टेंबर रोजी वर्ध्यात येऊन या सहा विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक स्तरावर आणखी व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामान त्यांना परत करावे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढावा आणि त्यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे.
             ‘जय भीम, जय संविधान’च्या घोषणांनाही बंदी ! या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. विद्यापीठ प्रशासन “जय भीम! जय संविधान!” या घोषणांनाही परवानगी देत नसल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यासाठीही विद्यार्थ्यांना परवानगी दिली जात नसल्याचे आंदोलनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, “विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यापासून का रोखले जाते? ‘जय भीम! जय संविधान!’ या घोषणांवर बंदी का?” असे प्रश्न आंदोलनाने उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामान ताब्यात घेतल्याचा आरोप वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांना त्यांचे कपडे, वैयक्तिक सामान आणि इतर वस्तू घेण्याचीही परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामान ताब्यात घेतल्याचे आंदोलनाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या हे सहा विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसराच्या बाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी आणि प्रशासनाच्या भूमिके विरोधात हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
           ‘विद्यार्थ्यांनी गुन्हा केला नाही, प्रशासनाने केला’ सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून त्यांनी केवळ आपल्या मूलभूत मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक होते, अशी भूमिका आंदोलनाने मांडली. “विद्यार्थ्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही; गुन्हा प्रशासनाने केला आहे,” अशी आक्रमक भूमिका सम्यक विद्यार्थी आंदोलनाने घेतली आहे. विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देणार सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या सहा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, त्यांना आवश्यक कायदेशीर मदत देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी संघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते कमलेश उबाळे, आनंदराज घाडगे, धीरज इंगळे, सागर भवते, श्रीकांत घोगरे, अक्षय डोंगरे, पीडित विद्यार्थी निरंजन कुमार, राजेश कुमार यादव, राहुल ठाकूर, शिवपूजन पासी, राकेश अहिरवार, यांच्यासह किशोर खैरकर, नगरसेवक नीरज वाघमारे, अजय सहारे, मंगेश वानखेडे, उत्कर्ष चौरपगार, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या