स्थानिक गुन्हे शाखेची बल्लारपूरात कारवाई, ११ किलो गांजासह २ लाख २२ हजारांचा मुद्देमालासह ५ आरोपी अटकेत (Local Crime Branch Conducts Operation in Ballarpur; 5 Accused Arrested with 11 kg of Ganja and Contraband Worth ₹2.22 Lakhs.)
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ महिला व २ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ११ किलो गांजा, एक ऑटो आणि मोबाईल संच असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह (३८) , रा. मक्का मशीद जवळ बल्लारपूर, लालचंद गणेश केसकर (६५) रा. सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर, उमा हामु नुनावत (५०), रा. मुळगु, जि. वरंगल, तेलंगणा, ललिता आकाश दामले (२४), रा. इटारसी, मध्यप्रदेश आणि आरती गुलाब परते (२८), रा. भोपाळ, मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. तसेच ओडिशातील मुनीगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ व रामबाबू यांची नावे निष्पन्न झाली असून ते सध्या फरार आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन येत असून बल्लारपूर येथील सहकाऱ्यांच्या मदतीने ऑटोद्वारे राजुरा परिसरात विक्रीसाठी जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर-राजुरा सास्ती मार्गावर सापळा रचला. दरम्यान, संशयित ऑटो क्रमांक एमएच-३४ बीएच-१६२६ थांबवून झडती घेतली असता, वाहनातील महिलांच्या पिशव्यांमध्ये ११ किलो अवैध गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ११ किलो गांजा, संबंधित ऑटो आणि चार मोबाईल संच असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक काँक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सफौ स्वामी चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, पोअं. गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, मपोअं/छाया निकोडे, अपर्णा मानकर, चापोअं गजानन मडावी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर च्या पथकाने केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या