टीईटीचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल पर्यंत स्विकारणार तर २१ जून रोजी परिक्षा (TET schedule announced, online applications will be accepted from March 27 to April 16, exam on June 21)

Vidyanshnewslive
By -
0
टीईटीचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल पर्यंत स्विकारणार तर २१ जून रोजी परिक्षा (TET schedule announced, online applications will be accepted from March 27 to April 16, exam on June 21)

पुणे :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, अन्य माहिती परीक्षा परिषदेच्या https://mscepune.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले. परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर १, सहावी ते आठवीसाठी पेपर २ या पद्धतीने परीक्षा घेतली जाते. त्यानुसार २१ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत पेपर १, तर दुपारी २.३० ते पाच या वेळेत पेपर २ची परीक्षा घेतली जाणार आहे. 
          अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्यतेचा निकाल दिल्यानंतर २०२५ मध्ये झालेल्या टीईटीमध्ये नोंदणी वाढल्याचे दिसून आले. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ३ हजार ३३४ उमेदवारांनी पेपर १साठी, तर २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर २साठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने २०१३पासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. तसेच परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. सर्वाधिक निकाल २०१८मध्ये ५.१३ टक्के लागला होता. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या टीईटीचा निकाल आजवरचा सर्वाधिक ११.२८ टक्के लागला होता. त्यामुळे ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले. आता राज्य परीक्षा परिषदेने वर्षातून दोनवेळा टीईटी आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता २१ जून रोजी टीईटी आयोजित केली जाणार आहे, तर पुढील टीईटी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)