अहमदनगर : जिथे संत ज्ञानेश्वर माउलींनी विश्वात्मक देवाकडे 'पसायदान' मागितले, त्याच नेवासा तालुक्यातील सौंदाळा या छोट्याशा गावाने आज अवघ्या महाराष्ट्रासमोर एक क्रांतीकारी आदर्श उभा केला आहे. सध्या देशात जात-धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात असताना, सौंदाळा ग्रामपंचायतीने आपले गाव 'जातमुक्त' झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. असा धाडसी निर्णय घेणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
केवळ कागदावर ठराव न मांडता, सौंदाळा ग्रामस्थांनी तो कृतीतून सिद्ध केला. गावातील १५ वेगवेगळ्या समाजाच्या तरुणांनी एकत्र येत रक्तदान केले. रक्ताचा रंग एकच आहे, तर माणसात भेद का? हा संदेश देत या गावाने मानसिकतेत बदल घडवून आणला. सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला.
१) गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.
२) सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली.
३) आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.
४) सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातिभेद बंद.
५) कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई होईल.
६) सौंदळा गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसे फलक लावण्यात येतील.
७) सोशल मीडियावर जाती भेदभावबाबत संदेश करणार नाही. कुणाला करूही देणार नाही.
८) शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
सौंदाळा गावाची ख्याती त्यांच्या शिस्तप्रिय आणि प्रगतशील निर्णयामुळे आधीपासूनच आहे. या गावाने यापूर्वी घेतलेले काही निर्णय थक्क करणारे आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मुलांकडे मोबाईल देण्यास बंदी. आणि नियम मोडल्यास ५०० रुपये दंड, हुंडा घेणारा कळवा आणि ५ हजार मिळवा या योजनेतून गावाने अनिष्ट प्रथांना सुरुंग लावला आहे, अतिवृष्टीच्या संकटात ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक मुलीचे पालकत्व स्वीकारून शैक्षणिक खर्च उचलला. दररोज सकाळी १० वाजता गावात भोंग्यावरून राष्ट्रगीत वाजवले जाते. शेतात काम करणारा शेतकरी असो वा वाटसरू, राष्ट्रगीत सुरू होताच जिथल्या तिथे थांबून राष्ट्रगीताचा सन्मान केले जाते. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद करून गावाने भाषिक संस्कृती जपली आहे. "आम्ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करत नाही, तर गावाला एक कुटुंब म्हणून पाहतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये केवळ पुस्तकात न राहता ती जगण्यात यावीत, हाच आमचा प्रयत्न आहे असे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे म्हणाले. १८०० लोकसंख्येचे हे छोटेसे गाव आज महाराष्ट्रासाठी 'प्रकाशाचे बेट' ठरले आहे. राजकारण आणि समाजकारण जेव्हा जातीच्या भोवऱ्यात अडकलेले दिसते, तेव्हा सौंदाळा गावाने दाखवलेली ही वाट उद्याच्या प्रगत महाराष्ट्राची नवी ओळख ठरू शकते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या