अन बल्लारपूर नगरपरिषदेच्या पराभवाची सल चक्क समाज माध्यमातून व्यक्त होऊ लागली (And the sting of the defeat in the Ballarpur municipal council elections has started to be expressed openly on social media.)

Vidyanshnewslive
By -
0
अन बल्लारपूर नगरपरिषदेच्या पराभवाची सल चक्क समाज माध्यमातून व्यक्त होऊ लागली (And the sting of the defeat in the Ballarpur municipal council elections has started to be expressed openly on social media.)

बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश संपादन करता न आल्याने पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच स्वीकृत सदस्य व गटनेतेपदाच्या निवडीवरून पक्षातंर्गत कलह चव्हाट्यावर आला असून थेट समाज माध्यमातून पोस्ट करीत पक्षाच्या एका जेष्ठ कार्यकर्त्याने खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष स्वीकृत सदस्य व सभापतीची निवड उद्या 12 जानेवारी रोजी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नगराध्यक्षपदाची पाच वर्षांची कारकीर्द आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय वजन आणि सत्तेचा पुरेपूर वापर असूनही भाजपाला नगर परिषद निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही. हा पराभव विरोधकांमुळे कमी आणि भाजपाच्या अंतर्गत विसंवादामुळे अधिक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून शहरात विकासकामांचा गवगवा करण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा यांचा दाखला देत, पाच वर्षांचा हिशेब मांडण्यात आला. मात्र, मतदारांनी या दाव्यांना फारसे महत्त्व दिले नाही. कारण विकासाच्या आकड्याआड पक्षातील गटबाजी, अहंकार आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण दडलेले होते. निवडणुकीतील पराभवाची बीजे उमेदवार निवडीतच पेरली गेली. स्थानिक कार्यकर्त्यांचा सल्ला, प्रभागनिहाय समीकरणे आणि जमीनीवरील वास्तव डावलून काही निवडक लोकांनाच तिकीट देण्यात आले. परिणामी, अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर काही प्रभागांत भाजपाचा कार्यकर्ता निवडणूक काळातच गप्प बसला. संघटन कमजोर झाली आणि त्याचा फटका थेट मतपेटीतून बसला. सर्वसाधारणपणे पराभवानंतर आत्मपरीक्षण अपेक्षित असते. पण, बल्लारपूर भाजपात उलट चित्र दिसले. निवडणुकीत अपयश येऊनही स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पुन्हा एकदा वाद पेटवण्यात आला. ज्यांनी निवडणूक जिंकविण्यात अपयशी ठरले, त्यांच्याच नावांचा आग्रह धरला गेल्याने तसेच माजी नगराध्यक्ष लखनसिंग चंदेल यांचे नाव गटनेतेपदी आघाडीवर होते. मात्र, त्यांना डावलून वरिष्ठ पातळीवरून दुसऱ्याचीच निवड केल्याने असंतोषाचा भडका उडाला. पाच वर्षे नगराध्यक्ष राहिलेले व तीन वेळा जिल्हाध्यक्षपद भूषविलेले नेते स्वतःची पत्नी व इतर उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरले, असे असतानाही स्वीकृत सदस्यपदासाठी दावा केल्याने संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच आरोपांची तोफ डागली आहे.
         भाजपासाठी इशारा की आत्मघात भाजपातील अंतर्गत वाद केवळ स्वीकृत सदस्यांपुरताच मर्यादित नाही तर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वशैलीवर, निर्णयप्रक्रियेवर आणि संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आता वरिष्ठ नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप करून नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. तर बल्लारपूर भाजपासाठी ही 'धोक्याची घंटा' ठरू शकते. सत्ता असूनही असमाधान सत्ता, संसाधने आणि प्रभाव असूनही जर कार्यकर्ते नाराज असतील. तर तो पराभवाचा नव्हे तर अपयशी नेतृत्वाचा संकेत असतो. बल्लारपूर भाजपाला आज विरोधकांपेक्षा स्वतःच्या अंतर्गत विसंवादाशी झुंज द्यावी लागत आहे. अन्यथा, हा अंतर्गत कलह आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी अधिक घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)