बनावट शिक्क्याचा वापर करून बोगस पट्टे वाटप करण्याचा आरोप, भाजपच्या उमेदवाराला अटक करण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी (Accused of distributing fake land deeds using a counterfeit seal, BJP candidate faces demand for arrest from MP Pratibha Dhanorkar.)

Vidyanshnewslive
By -
0
बनावट शिक्क्याचा वापर करून बोगस पट्टे वाटप करण्याचा आरोप, भाजपच्या उमेदवाराला अटक करण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी (Accused of distributing fake land deeds using a counterfeit seal, BJP candidate faces demand for arrest from MP Pratibha Dhanorkar.)

चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून गरिबांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. चंद्रपूर शहरातील राजू नगर परिसरात भाजपचे अधिकृत उमेदवार यांनी बनावट शिक्के असलेले तथाकथित पट्टे वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भाजप उमेदवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर आणि प्रशांत भारती उपस्थित होते.
            या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंद्रपूर महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन चौकशी केली असता, संबंधित कागदपत्रांवरील सर्व शिक्के प्रशासकीयदृष्ट्या अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी (जावक क्र. ३५९, १२ जानेवारी २०२६) रामनगर पोलीस ठाण्याला पाठविलेल्या पत्रात हे शिक्के बनावट असल्याचे नमूद केले आहे. हा प्रकार शासकीय कामकाजाच्या विश्वासार्हतेला तडा देणारा असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तपासात असेही निष्पन्न झाले की, महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामार्फत असे कोणतेही शिक्के तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित प्रकारात दोषींवर कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे प्रशासनानेही स्पष्ट केले आहे. शहरात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू असताना, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी सरकारी मोहोर व पदाचा गैरवापर करून बोगस पट्टे वाटणे हे आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच शासकीय यंत्रणेची बदनामी करण्यासारखा गंभीर फौजदारी गुन्हा ठरत असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजपचे उमेदवार तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्व संबंधितांविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग व फसवणुकीचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. दरम्यान, महानगरपालिकेने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सहायक नगर रचनाकार प्रतिक देवतळे यांची नियुक्ती केली असून, पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)