बल्लारपूर नगर परिषदच्या बांधकाम ठिकाणी कामगाराचा मृत्यू, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात ? (A worker died at a construction site of the Ballarpur Municipal Council; the cause of death remains a mystery.)
बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषदच्या बांधकामाधीन इमारतीत कार्यरत असलेल्या एका कामगाराचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हीरालाल सुंदरसिंह (२८), रा. छुरिया, गेंडाटोला, मातेखेड़ा, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव आहे. नगर परिषद इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून हीरालाल हे तेथे मजूर म्हणून काम करत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती असून, त्यांच्यावर बल्लारपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र कामाच्या ठिकाणीच किंवा कामादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूनंतर नातेवाइकांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोस्टमार्टम अहवाल व पोलिस तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण आजार, दारू सेवन किंवा कामातील दुर्लक्ष यापैकी कोणते आहे, हे स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे मृतक कामगाराला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या घटनेबाबत अधिक संशय व्यक्त केला जात आहे. तसेच नगर परिषद व संबंधित ठेकेदार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमांनुसार बांधकामस्थळी कामगारांसाठी आरोग्य व सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना, उपचारांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आज सकाळी मृतकाचे नातेवाईक बल्लारपूर येथे येऊन पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह छत्तीसगड येथे घेऊन गेले. या प्रकरणाचा तपास पोलीस ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जंगमवार करीत असून, प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या