बल्लारपूरच्या बेपत्ता रणजितचा १९ दिवसांनंतर संशयास्पद मृत्यू आढळला, कुटुंबीयांची सीआयडी चौकशीची मागणी (Missing Ranjit of Ballarpur found dead under suspicious circumstances after 19 days, family demands CID inquiry)
बल्लारपूर :- बल्लारपूर येथील लोकमान्य टिळक वॉर्डातील अल्पवयीन रणजित उर्फ कटरणी दिनेश निषाद (१७) याचा १९ दिवसांनी मृतदेह मानोली गावाजवळील एका शेतशिवारात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ५ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या रणजितच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. रणजित ८ ऑगस्ट रोजी रात्री त्याच्या सात मित्रांसोबत राजुरा तालुक्यातील गौरी सास्ती परिसरातील कोळसा वॉशरीमध्ये गेला होता, पण परत आला नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांना राजुरा पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र त्यात रणजित नव्हता. त्याचा मोबाइल फोन दाऊद नावाच्या मित्राने पोलिसांकडे जमा केला होता. तेव्हापासूनच कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर संशय व्यक्त केला होता. गेले १९ दिवस रणजितचा शोध सुरू होता. यादरम्यान रात्रीच्या वेळी कोळसाखाणीत आणि ट्रकमधून बॅटरी व डिझेलचोरीचे प्रकार घडत असल्याने रणजितच्या गायब होण्यामागे काहीतरी गंभीर कट असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. अखेर त्याचा मृतदेह मानोली शिवारात आढळला. मृतदेह पूर्णपणे सडल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी कुटुंबीयांनी पत्रपरिषद घेऊन सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या