Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गणेश मंडळांना वेळेत परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा, सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत (Implement a ‘Single Window’ scheme to grant timely permissions to Ganesh Mandals; celebrate festivals peacefully and in an eco-friendly manner – District Collector Vasumana Pant.)

गणेश मंडळांना वेळेत परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा, सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत (Implement a ‘Single Window’ scheme to grant timely permissions to Ganesh Mandals; celebrate festivals peacefully and in an eco-friendly manner – District Collector Vasumana Pant.)

स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर, सोशल मीडियावर सायबर टीमची 24x7 नजर; लेझर लाईटला पूर्णपणे बंदी

चंद्रपूर -: चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे. आगामी ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा, गणेशोत्सव आदी सण-उत्सव सर्वांनी परस्पर सहकार्य, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत. तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. नियोजन भवन येथे शुक्रवारी (दि.21) आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, मनपाचे उपायुक्त संजय चिद्रावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समिती व दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वसूमना पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात गणेश मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू असणार आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदांनीही अशी व्यवस्था सुरू करून गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या वेळेत द्याव्यात. ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत.
      गणेशोत्सव काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि गणेश मंडळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. निर्माल्य आणि इतर कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम विसर्जन टँकची माहिती नागरिकांना आधीच उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मंडळांनी किमान दोन सीसीटीव्ही लावावेत पोलिस अधीक्षक आयुष नोपानी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले की, कोणताही कार्यक्रम पूर्व परवानगीशिवाय आयोजित करू नये. मंडप किंवा होर्डिंग उभारताना सार्वजनिक जागा व्यापली जाणार नाही, तसेच नागरिक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर रोखण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावे. मूर्तीचे विडंबन होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून समाजकंटकांना ओळखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            मनपा हद्दीत घोषित करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये ध्वनी प्रदूषण खपवून घेतले जाणार नाही. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनी संबंधित नगर परिषदांशी समन्वय साधून तालुका स्तरावर सायलेंट झोन निश्चित करावेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर टीम 24x7 कार्यरत आहे. लेझर लाईटच्या वापराला पूर्णपणे बंदी असून उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नोपानी यांनी केले. नागरिकांनी मांडल्या सुचना बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. विसर्जनाची योग्य व्यवस्था करणे, भूमिगत गटारांच्या कामामुळे रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊ न देणे, डीजेचा वापर टाळणे, गावपातळीवर चोख बंदोबस्त ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवणे व त्या पसरू न देणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे, पीओपीच्या मूर्ती टाळणे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा असामाजिक तत्त्वांची माहिती तातडीने पोलिसांना देणे, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करणे आणि सण-उत्सवांच्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत राहील याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, आदी सूचनांचा यात समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम गव्हाणे यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी केले, तर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आभार मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या