Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

जिल्ह्यातील 2.70 लाखांवर मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता 1 ऑक्टो. 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नाव नोंदणीची संधी (Names of over 2.70 lakh voters in the district likely to be deleted; opportunity for new voters turning 18 by October 1, 2026, to register.)

जिल्ह्यातील 2.70 लाखांवर मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता 1 ऑक्टो. 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नाव नोंदणीची संधी (Names of over 2.70 lakh voters in the district likely to be deleted; opportunity for new voters turning 18 by October 1, 2026, to register.)

प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित, अनुपस्थित किंवा अन्यत्र/दुबार नोंद असलेले सुमारे 2 लाख 70 हजार इतके मतदार नियमानुसार / प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास अपात्र असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना अनकलेक्टेबल ई.एफ. या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. या 2 लक्ष 70 हजार 195 मतदारांमध्ये, आढळून न आलेल्या मतदारांची संख्या 28 हजार 581, कायमस्वरुपी स्थलांतरीत 1 लक्ष 62 हजार 853, मृत 51 हजार 913, अन्यत्र नोंदणी केलेले / दुबार 25 हजार 598, इतर 1250 मतदार आहेत. या गटातील मतदारांच्या तात्पुरत्या याद्या 12 ऑगस्ट, 2026 रोजी जिल्हा कार्यालयाचे https://chanda.nic.in वर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर याद्यांमधील मतदारांपैकी कोणत्याही मतदाराबाबत राजकीय पक्षांच्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींकडून (बीएलए) माहिती दिल्यास, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) माहितीची पडताळणी करून त्याचे गणना प्रपत्र भरून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि प्रारूप मतदार यादी तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी आता 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात 84.97 टक्के मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण : जिल्ह्यात 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत 2,076 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदार 17 लक्ष 97 हजार 655 आहे. गणना प्रपत्र भरून पडताळणी पूर्ण झालेले मतदार 15 लक्ष 27 हजार 460 (84.97 टक्के) आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, 3 नवीन केंद्रांची निर्मिती तर 13 केंद्रांचे विलीनीकरण मतदारांच्या सोयीसाठी 1300 पेक्षा जास्त मतदार शिल्लक असलेल्या ठिकाणी 3 नवीन उप-मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. कमी मतदार असलेली 13 केंद्र विलीन करण्यात आली असून सुसूत्रीकरणाअंती जिल्ह्यात आता एकूण 2066 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.विशेष सखोल पुनरीक्षणाचे (एसआयआर) सुधारित वेळापत्रक : 1) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना - 24 ऑगस्ट 2026 पर्यंत, 2) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - 31 ऑगस्ट 2026, 3) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी - 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026, 4) नोटीस व दावे/हरकती निकाली काढणे - 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026, 5) अंतिम मतदार यादी प्रसिद्धी - 04 नोव्हेंबर 2026
        31 ऑगस्टपासून महिनाभर दावे व हरकती नोंदवण्याची संधी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे सदरहू मतदार याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सॉफ्ट व हार्ड कॉपीच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये नियमानुसार समाविष्ट करता आली नाहीत, अशा अनकलेक्टेबल गटातील मतदारांच्या याद्या संबंधित शासकीय कार्यालयांच्या सुचना फलकावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या पात्र नागरिकांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नसतील किंवा ज्या मतदारांचे वय 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण होत आहे, अशा नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. 6 (घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह) भरता येईल. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्र. 8 तर अपात्र नावांबाबत आक्षेप/वगळणीसाठी नमुना क्र. 7 भरून देता येईल. हे अर्ज मतदार सेवा पोर्टलद्वारे (ऑनलाइन) किंवा संबंधित बीएलओ मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे ऑफलाइन सादर करता येतील. जिल्हा प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये आपले व आपल्या कुटुंबीयांचे नाव असल्याची खात्री करावी. नाव नसल्यास अथवा दुरुस्ती असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करून आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या