Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने : दोन अत्याधुनिक मोबाइल सीसीटीव्ही व्हॅन सेवेत (14 new vehicles added to Chandrapur police fleet; two state-of-the-art mobile CCTV vans enter service.)

चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात १४ नवीन वाहने : दोन अत्याधुनिक मोबाइल सीसीटीव्ही व्हॅन सेवेत (14 new vehicles added to Chandrapur police fleet; two state-of-the-art mobile CCTV vans enter service.)

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पोलिसांच्या कार्यक्षमतेला आणि गतिशीलतेला बळ देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहने दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून उपलब्ध झालेल्या या वाहनांचा लोकार्पण सोहळा शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. यासोबतच शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दोन अत्याधुनिक मोबाइल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनही सेवेत दाखल करण्यात आल्या. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या मोबाइल सीसीटीव्ही व्हॅन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. संवेदनशील भाग, मोर्चे, सण-उत्सव तसेच मोठ्या गर्दीच्या ठिकाणी या व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर थेट नजर ठेवणे आणि आवश्यकतेनुसार तातडीने निर्णय घेणे पोलिसांना शक्य होणार आहे. या व्हॅनवर उच्च क्षमतेचे PTZ तसेच नाईट-व्हिजन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ३६० अंशात फिरणारे हे कॅमेरे परिसराचे स्पष्ट चित्रण करण्यास सक्षम आहेत. कॅमेऱ्यांद्वारे मिळणारे दृश्य मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असल्याने अधिकारी घटनास्थळावरूनच परिस्थितीचे निरीक्षण करू शकणार आहेत. 
         व्हॅनमध्ये आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग व स्टोरेजची सुविधा तसेच सार्वजनिक घोषणा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती, गर्दी नियंत्रण किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सुविधांचा तातडीने वापर करता येणार आहे. यावेळी खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार करण देवतळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, चंद्रपूर मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार, प्रशासकीय अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या १४ नवीन वाहनांमुळे जिल्ह्यातील पोलीस गस्त अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे तसेच पोलिसांच्या दैनंदिन कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दिशेने चंद्रपूर पोलीस दलाने आणखी एक पाऊल टाकले आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या