चंद्रपूर :- चंद्रपूर ते पुणे आणि चंद्रपूर ते मुंबईला सरळ रेल्वे सेवा नाही. नावासाठीच फक्त शासनकर्ते चांदा ते बांदा असं म्हणत राहतात. चंद्रपूरची लोक जे मागणार ते मिळणार नाही, जे मागणार नाही ते मात्र नक्कीच जबरदस्तीने दिले जाईल, अशी सध्या तरी शासनाची स्थिती आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ही महत्वपूर्ण मागणी लोकांनी केली, परंतु या मागणीला स्थानिक नेत्यांनी उचलून धरलेच नाही. शेवटी ही गोष्ट आता जनआंदोलनात बदलत असल्यामुळे हे सर्व नेते उपोषणाच्या मंडपाला भेटी देत आहेत. सध्या या मागणीला चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण कार्यकर्ते, डॉक्टर्स, वकील, शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती या सर्वांचेच समर्थन मिळत आहे. चंद्रपूरच्या सामान्य लोकांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर चंद्रपूर- पुणे रेल्वेची मागणी ठेवली आहे. डबल इंजन चा फायदा फक्त उद्योजकांना, लोकांना काहीच नाही... खरे तर लोकांची ही मागणी लक्षात घेऊन आतापर्यंत चंद्रपूरतील विविध आमदार आणि मंत्री डबल इंजन हातात असल्यामुळे चंद्रपूर ते मुंबई ही रेल्वे सेवा सहज देऊ शकले असते, परंतु यांनी त्यांची शक्ती लोकांच्या मागण्यांसाठी वापरलीच नाही. चंद्रपूर मधील विरोधी पक्षांचेही नेते शक्तीहीन झाल्यासारखे, सत्ताधाऱ्यांशी हात मिळवल्यासारखे वागत आहेत, त्यांच्या असेंबली मधील किंवा पार्लमेंट मधील प्रश्नांत लोकांच्या मागण्या नाहीत. नागपूर ते चंद्रपूर हा फोर लेन रोड असताना, चंद्रपूरकरावर आणखी एक नवीन रोड लादला जातो आहे. हा नवीन रोड कोणासाठी आहे? ही लोकांची मागणी होती का? चंद्रपूरच्या शेवटच्या टोकावर मूर्ती कडे विमानतळ कुणासाठी? ही लोकांची मागणी आहे काय? पण लोकांची जी मागणी आहे, ती पूर्ण केलीच जाणार नाही.
चंद्रपूर - मुंबई, चंद्रपूर - पुणे, या मागण्या लोकांच्या. चंद्रपूरहून दररोज २५ बसेस पुणे साठी जातात. म्हणजे जवळपास १००० लोक चंद्रपूर ते पुणे दररोज प्रवास करतात. नागपूर वरून हा आकडा १७५ बसेसचा आहे. इतक्या मोठ्या संख्येने पुण्याला जाणारी लोक कोण आहेत? मोठ्या प्रमाणात यात विद्यार्थी, पुण्यात नोकरी करणारे विविध कंपन्यातील इंजिनियर्स, व्यापारी वर्ग यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक विकासात हातभार लावणारी ही लोकं आहेत, आणि विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. उद्याचा हा भविष्य अतिशय धोकादायक अशा समृद्धीच्या धोकादायक मार्गावरून प्रवास करतो, दररोज लहान मोठ्या अपघात या रोडवर होत आहेत. हा वर्ग जेव्हा दिवाळीला घरी परत येतो, तेव्हा एका बाजूची तिकीट ही ७००० ते ८००० रुपयांपर्यंत गेलेली असते. कधी कधी बस न येण्यापेक्षा ते विमानाने येणं पसंत करतात, कारण बसचे तिकीट पेक्षा विमानाचे तिकीट कमी असते. या गोष्टीकडे चंद्रपूर मधील डबल इंजिनच्या पायलेट नेत्यांना लक्ष द्यायला वेळ मिळेल का? चंद्रपुरात ही सरळ रेल्वे नसल्यामुळे चंद्रपूरच्या उद्योगावरही त्याचा वाईट परिणाम झालेला आहे. हे उधोजक लोक चंद्रपूरच्या दक्षिणेला नवीन विमानतळाची मागणी करत आहेत. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर जी काही विमान उतरतात, ती या उद्योजकांचीच असतात. पण याच त्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. चंद्रपूर ते मुंबई किंवा पुणे ही रेल्वे गाडी सुरू झाल्यास या उद्योजकांनाही मोठीच मदत मिळणार आहे.
ताडोबाला सुद्धा फायदा होईल आफ्रिकेतील केनिया, टांझनिया, बोतस्वाना, अशा गरीब देशांनी जंगलांच्या जवळच्या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळांची निर्मिती केली आहे. त्या विमानतळामुळे त्या भागातील ओकावंगो, मसाईमारा अशी अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन्स बनले आहेत. चंद्रपूरच्या विमानतळाच्या भोवताल नवीन इंडस्ट्री स्थापन केल्यामुळे मोठी विमान चंद्रपूरला आत्ता उतरू शकत नाहीत. चंद्रपूरच्या विमानतळाचे नूतनीकरण आणि एक्सपान्शन किती गरजेचे आहे हे यावरून समजते. पण ही ट्रेन सुरु जर झाली तर तिचे नाव सुद्धा आपण ताडोबा एक्सप्रेस ठेवू शकतो. पट्टीदार वाघांची भारतातील संख्या ही संपूर्ण जगातील वाघांच्या एकूण लोकसंख्येत ७०% इतकी मोठी आहे. याचा फायदा उचलणार आहात की नाही? तुम्ही फक्त साधन संपत्तीसाठी, कोळसासाठीच ट्रेन सुरू करणार आहात काय ? ब्रिटिशांनी १९०८ च्या आसपास, सुरुवातीला घुगुस आणि नंतर बल्लारशाह पर्यंत ट्रेन सुरू केली. अर्थातच ती फक्त कोळशासाठी होती. आताही तुमची तीच प्रवृत्ती असणार आहे का? भामरागड आणि सुरजागड पर्यंत तुम्ही ट्रेन नेण्याची स्वप्न पाहतात, पण चंद्रपूरच्या लोकांकडे तुमचे दुर्लक्ष जर असेल तर तुमच्या मध्ये आणि ब्रिटिशांमध्ये फरक काय आहे? आता लोकांना आणि त्यांच्या साधन संपत्ती लुटणे बंद करा, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. ज्या संसदेत तुम्ही आपले मुद्दे मांडता, ती संसद आमच्याच लाकडांनी तयार झाली आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही आमचीच आमचीच लाकडी लावलीत, प्रत्यक्ष तेथील लोकांसाठी आणि आदिवासींसाठी तुम्ही काहीतरी करणार आहात की नाही?
मार्गदर्शन :- डॉ. योगेश दूधपचारे, चंद्रपूर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या