चंद्रपूर -: बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (रजि. ट्रेड युनियन) च्या वतीने विदर्भ–मराठवाडा विभागाचा सात दिवसीय संघटनात्मक दौरा गुरुवारपासून नागपूर येथून सुरू होत आहे. या दौऱ्याद्वारे संघटन विस्तार, सदस्यता अभियान, वार्षिक अधिवेशनाची तयारी तसेच विविध संघटनात्मक विषयांवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. या दौऱ्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे, संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, कोषाध्यक्ष प्रा. अशोक ठवळे आणि सचिव सिद्धार्थ सुमन सहभागी होणार आहेत. दौऱ्याचा प्रारंभ 16 जुलै रोजी नागपूर येथून होऊन भंडारा व गोंदिया येथे मुक्काम असेल. 17 जुलै रोजी वडसा, गडचिरोली मार्गे चंद्रपूर, 18 जुलै रोजी वरोरा, वणी, यवतमाळ, 19 जुलै रोजी आर्णी मार्गे नांदेड, 20 जुलै रोजी हिंगोली, वसमत, वाशीम, कारंजा, 21 जुलै रोजी अमरावती येथे मुक्काम करण्यात येणार असून 22 जुलै रोजी पुलगाव व वर्धा मार्गे नागपूर येथे दौऱ्याचा समारोप होणार आहे. या दौऱ्यात 'बि.ई.एफ. समाचार' च्या धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांकासाठी शुभेच्छा संदेश संकलन, 9 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या स्व. श्रीकृष्ण उबाळे स्मृतिदिन व वार्षिक अधिवेशनाच्या तयारीचा आढावा, तसेच संघटनात्मक बांधणी, सदस्यता अभियान आणि विविध प्रलंबित संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्ष, संयोजक आणि पदाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यक्रमांची नोंद घेऊन आवश्यक तयारी करावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या