बहुचर्चित किडनी रॅकेट मध्ये ५० जणांची किडनी विक्री झाल्याचा अंदाज, ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर, कोटींची उलाढाल.....(It is estimated that 50 people's kidneys were sold in the much-discussed kidney racket, 11 people's kidneys were officially sold, turnover in crores.....)

Vidyanshnewslive
By -
0
बहुचर्चित किडनी रॅकेट मध्ये ५० जणांची किडनी विक्री झाल्याचा अंदाज, ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर, कोटींची उलाढाल.....(It is estimated that 50 people's kidneys were sold in the much-discussed kidney racket, 11 people's kidneys were officially sold, turnover in crores.....)

चंद्रपूर :- किडनी रॅकेटमध्ये आजवरच्या तपासात ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. मात्र या रॅकेट अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे ५० जणांची किडनी विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील ३६ वर्षीय शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी विकल्याचे प्रकरण १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आले होते. कुळे हे खासगी सावकारांच्या कर्जामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नसल्याने त्यांनी समाजमाध्यमाचा आधार घेतला. फेसबुकवर किडनीविक्री संदर्भात शोध घेत असताना त्यांची भेट डॉ. कृष्णा नावाच्या प्रोफाइलशी झाली. आरोपीने रोशन यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांना किडनीच्या बदल्यात आठ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विमानाचे तिकीट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करून रोशन यांना कम्बोडियाला नेण्यात आले. तिथल्या एका खासगी रुग्णालयात कुळे यांची किडनी काढण्यात आली. याविषयीच्या अधिक तपासातून किडनी रॅकेट उघडकीस आले. 
            किडनी प्रत्यारोपण प्रकरणाचे देशांतर्गत जाळे उघड झाले. तामिळनाडू राज्यातील त्रिची शहरातील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी आपल्या रुग्णालयात अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. किडनी घेणाऱ्या व्यक्तीकडून ५० ते ८० लाख रुपये घेतले जात असल्याचे यातून उघड झाले असून किडनी देणाऱ्या व्यक्तीला फक्त पाच ते आठ लाख रुपये मिळत होते. डॉ. रवींद्रपाल सिंग याला दहा लाख रुपये, डॉ. राजरत्नम गोंविदस्वामीला सर्जरी व हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख तर क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू व इतर लोकांना २० लाख रुपये मिळत होते. दरम्यान, डॉ. सिंग याने चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वारंवार 'मला आठवत नाही' असे उत्तर दिले होते. परिणामी किडनी रॅकेटची प्रगती मंदावली होती. मात्र आता कोलकाता, त्रिचीसह अनेक प्रयोगशाळांमधील वैद्यकीय व रक्त तपासणीची महत्त्वाची कागदपत्रे मिळालेली आहेत. नेमक्या किती लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या याबाबत माहिती पुढे येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून डॉ. रवींद्रपाल सिंग याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांसमोर तो हजेरी लावत आहे. यादरम्यान पोलिसांकडून चौकशी केली जात असली, तरी त्यात त्याच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. याप्रकरणी उद्या, २४ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे. 
       या एकूणच प्रकरणात आतापर्यंत सहा सावकारांसह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या किडनी विक्री प्रकरणात डॉ. रवींद्रपाल सिंग व तामिळनाडूचे डॉ. गोंविदस्वामी हे दोन प्रमुख आरोपी आहेत. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाज यांचा साथीदार पॉल आणि डॉ. गोविंदस्वामी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी 'मटा'शी बोलताना दिली. तीन सावकारांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. राज्य सरकारने विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना मानवी अवयव आणि प्रत्यारोपण कायदा (थोटा), १९९४ अंतर्गत आरोपींची चौकशी आणि खटला चालवण्यासाठी अधिकृत केले आहे. एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान मागील काही महिन्यात बँक खात्यातून सुमारे २० कोटींचा व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. मात्र ते पैसे त्यांच्या नियमित व्यवहारातील असल्याचा अंदाज असून तसा हा आर्थिक व्यवहार रोख रकमेनेच झाले असण्याची दाट शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)